आज सकाळी हॉस्पिटल वरून घरी आयसोलेट व्हायला निघालो आणि आठवलं की आज बरोबर ३ आठवड्याने घरी जातोय (तेही एका वेगळ्या आयसोलेट केलेल्या रूम मध्येच) आणि अचानक गेले २१ दिवस झरकन डोळ्यापुढे आले. या २१ दिवसांनी खूप काही शिकवलं. १९ ऑगस्टला दुपारी जरा त्रास होऊ लागला. कोरोनाच्या मदतकार्यात फिल्डवरच होतो, एक मीटिंग चालू होती. त्रास होत आहे हे लक्ष्यात आल्यावर पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज आला होता. मीटिंग मधून तडक बाहेर पडलो आणि swab दिला. त्या दिवशी स्वतःला आयसोलेट करून घेतले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. जास्त लक्षणे नसल्याने होम क्वारंटाईन होऊन उपचार घ्यावे असे डोक्यात होते, त्या दृष्टीने या २४ तासात घरी तयारीही केली होती. मात्र, फक्त swab च्या निकालावर उपचार अवलंबून नसतो, त्यासाठी सिटी स्कॅन आणि एक्स-रे काढून नक्की किती इन्फेक्शन आहे हे समजून घ्यावे लागते. माझा ही सीटी स्कॅन काढला आणि त्यातून निष्कर्ष आला की बऱ्यापैकी इन्फेक्शन आहे. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागणार हे उघड होते. आजवर इतरांना बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असताना आता स्वतःलाच बेड हवा होता. त्यामुळे, हॉस्पिटलला भरती झालो आणि पुढची ट्रीटमेंट सुरू झाली.
या सगळ्या काळात डोक्यात एक गोष्ट रुंजी घालत होती ती म्हणजे "अर्जुन"च काय? अर्जुन नुकताच ५ महिन्याचा झाला होता. त्याचा जन्मच कोरोनातला. तेव्हा पासून जे कोरोना संकट चालू होतं ते अजूनही सुरू आहे. त्यामुळे, "बाप"पण अनुभवता आलं नव्हतंच.. पण, आता माझ्यामुळे त्याला आणि पर्यायाने पूजाला अजून त्रास होणार होता. एव्हाना माझा भाऊ पृथ्वीराज पॉझिटिव्ह आला होता. घरातील मदतनीस पॉझिटिव्ह होते. त्यामुळे आई एका खोलीत, वडील दुसऱ्या खोलीत आयसोलेट, आजी दुसरीकडे आयसोलेट, तर पत्नी आणि मुलगा तिसरीकडे अशा चार ठिकाणी जवळची लोक. यांच्या मदतीला कोणीच नाही... मी आणि पृथ्वीराज हॉस्पिटल मध्ये आणि या सगळ्याला कुटुंबाला सांभाळत परत अख्ख्या कोल्हापूरला आपले कुटुंब मानून राबणारे बंटीकाका... टीम अजिंक्यतारातील प्रमुख शिलेदार सुद्धा पॉझिटिव्ह..त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या टीमवर ही लोड.. त्यामुळे काय करावे, कसे सांभाळावे या सगळ्या पॅनिकमध्येच पहिले २-३ दिवस गेले. या सगळ्या धांदलीत मी कदाचित तुमच्यापैकी काही जणांचे फोन उचलू शकलो नसीन, त्याबद्दल मनापासुन दिलगिरी व्यक्त करतो...
मग पुढचे १० दिवस सुरू होती ती एकप्रकारची परीक्षा..
कोरोनाचा विषाणू आपल्या फुफुसावर हल्ला करतो आणि त्यावर प्रतिहल्ला करणाऱ्या अँटीबॉडी तयार व्हायला शरीर आणि मनाला पुरेशी उसंत द्यावी लागते. तुम्ही ऐकलं असेल की ही शांतता लाभावी म्हणून बहुतांशी पेशंट ना टिव्ही, फोन वापरू दिला जात नाही.. जेणेकरून शरीर आणि मन एकाग्र पणे कोव्हिड विषाणूचा सामना करू शकेल. मीही ते करायचा प्रयत्न करत होतो. पण, माझ्यातला बाप आणि कार्यकर्ता मला स्वस्थ बसू देत नव्हता. दिवसातून ४-५ वेळा अर्जुनला व्हिडीओ कॉल लाऊन तो ठीक आहे ना ते पाहत होतो. पूजा अभिमन्यू सारखी एकटीच लढत असताना मी तिला काहीच मदत करू शकत नव्हतो याने मन खायला उठायचं! दुसऱ्या बाजूला आई-वडील आठवायचे, एका बाजूला त्यांची दोन्ही मुलं पॉझिटिव्ह, नातू जवळ नाही आणि कुटुंबातील जवळचे १५ हुन अधिक नातेवाईक पॉझिटिव्ह. या सगळ्या प्रेशर मध्ये मम्मी आणि पप्पा स्वतः ठामपणे उभे होते पण स्वतः वरचे प्रेशर न जाणवू देता आम्हा सगळ्यांना भक्कम मानसिक आधार देत होते. त्यांच्या मनात नक्की काय सूरु असेल याचा विचार करून मनात कालवाकालव व्हायचीच! रोज नियमितपणे, न चुकता, माझ्याशी आणि डॉक्टरांशी बोलून सगळं सुरळीत करणारे बंटीकाका आठवायचे, गणपतीचा ऐन सण सोडून आमच्या मदतीला धावलेले असंख्य लोक आठवायचे. त्यातून थोडं बाहेर आलो की मग दिवसभरात बेड/औषधे यासाठी आलेले फोन/ मेसेज पाहून त्यांच्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे असं सगळं सुरू होतं. स्वतः साठी औषधे ही सुरू होतीच.
जनरली, ६-७ दिवसानंतर इन्फेक्शन कमी होतं असा आजवरचा अनुभव आहे. पण, या सगळ्या धांदलीमुळे ८ व्या दिवशीच्या तपासणीत माझं इन्फेक्शन काहीच कमी न झाल्याचे डॉक्टर ना दिसले आणि त्यामुळे रेमेडिझिवर या इंजेक्शनचा डोस त्यांनी चालू केला... त्याने जरा आराम पडला, मात्र १४ व्या दिवशी तपासणी केली असता इन्फेक्शन कमी झाले असले तरी मी अजून पॉझिटिव्ह च असल्याचे दिसून आले.. मात्र, १४ व्या दिवसानंतर आपण इतरांना इन्फेक्त करायची शक्यता जवळपास शून्यावर येते. त्यामुळे, बेड न अडवता दुसऱ्या ठिकाणी येऊन आयसोलेट झालो, मात्र इथेसुध्दा एकटेपणा खायला उठला मग शेवटी डॉक्टरांच्या सल्याने आजपासून काही दिवस घरीच आयसोलेट होत आहे, अजूनही फुफूसात Patches आहेत, हिलींग व्हायला एक-दोन आठवडे लागतील अस डॉक्टर म्हटले आहेत. त्यांच्या सल्याने योग्य असेल ती काळजी घेईनच, पण आता तरी ही लढाई बऱ्यापैकी जिंकली आहे असं वाटतंय.
यातून शिकलेल्या महत्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो.
१. कोविड हा अत्यंत गंभीर आजार असून त्याला कोणीही "त्याला काय हुतय" म्हणून लाईटली घेऊ नका.. तरणेबाँड जवान, म्हातारे, लहान मूल कोणालाही कोव्हिडं होऊ शकतो, त्यामुळे मला होणार नाही रे असे म्हणून कॅज्युअली घेऊ नका..
२. कोव्हिडं पूर्ण बरा होतो हेही तितकंच खरं, पण त्यासाठीच मुख्य सूत्र आहे म्हणजे वेळेत निदान व उपचार. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास लगेच चाचणी करून घ्या, अंगावर काढू नका.. योग्य उपचाराने कोरोना बरा होतो.
३. आमदार असो, बिझनेसमन असो की सामान्य नागरिक, कोरोनाची लढाई तुम्हाला एकट्यालाच लढावी लागते, इच्छा असूनही इथे तुमच्या शेजारी कोणी येऊन बसू शकत नाही. त्यामुळे, लढायचं आणि जिंकायचं हे डोक्यात ठेवायलाच हवं!
४. सकस आहार, पोझिटिव्ह थिंकिंग, मन स्वास्थ्य आणि औषधे ही कोरोनाला हरवायचे चार मोठे शस्त्रे आहेत. त्यांचा नीट वापर केल्यास आपण कोरोनामुक्त होतो.
६. जे कोरोनातून यशस्वी होऊन बाहेर पडले आहेत त्यानी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर लगेच जोराने कामाला लागू नये. कोरोनाचा विषाणू जरी गेला असला तरी फुफूसाला पूर्ण रिकव्हर व्हायला वेळ द्यावा लागतो. असा वेळ न दिल्याने निगेटिव्ह आल्यावर ही पुन्हा ऍडमिट व्हायच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत, त्यातून कॉम्प्लिकेशन वाढतच आहेत. हे टाळायचे असेल तर मर्दमुकी न दाखवता पूर्ण विश्रांती घेणे सर्व पेशंटसाठी हिताचे आहे.
काहीजण लक्षणे नसताना, सौम्य लक्षणे असताना पॉझिटिव्ह आले, ते लवकर बरे झाले. माझ्याबाबत जरा वेगळे घडले, माझा एचआरसिटी स्कोर 19 होता. त्यामुळे माझा रिपोर्ट निगेटिव्ह यायला तब्बल 22 दिवस लागले. त्यामुळे आता पूर्ण बरे होण्यासाठी विश्रांती घेणे क्रमप्राप्त आहे. जेवढी कोरोनाची तीव्रता अधिक तेवढा बरे होण्यासाठीचा, विश्रांतीचा काळ अधिक असे हे सूत्र आहे. कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही, त्यामुळे, आपण सर्वांनीच योग्य ती काळजी घेऊन ही लढाई लढली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, शक्य तेवढे गर्दीत जाणे टाळणे, प्रशासनाच्या सूचना पाळून प्रशासनाला सहकार्य करणे, हे अगदी गरजेचे आहे. मीही लवकरच नव्या जोमाने फिल्ड वर कार्यरत होईनच..
कोरोना होऊन गेला असल्याने आता जास्त जोमाने लढता येईल. पण, तोवर मला आलेले अनुभव तुम्हाला सांगावेत म्हणून हा ब्लॉग. एक पिता, पती, मुलगा, कार्यकर्ता म्हणून मला काय वाटलं हे तुम्हाला सांगावस वाटलं इतकंच. यातून कदाचित काही लोकांना काही चार गोष्टी नव्या कळल्या तर ते फायद्याचे ठरेल. बाकी राजकारण वगैरे सुरू राहिलंच.. पण, मी तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत सदैव आहात या नात्याने केलेला हा दिल से संवाद.. जान है तो जहान है, हे मात्र पक्के लक्षात ठेवा, कदाचित कोरोनाचा हाच धडा आहे...
- ऋतुराज पाटील
Comments