माझा शेतकरी, माझा पाठिंबा!
" भारत बंद " - मंगळवार, दि. 8 डिसेंबर, 2020
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत लाखो शेतकरी गेली १३ दिवस झाले ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून, उद्या मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजीच्या या 'भारत बंद' मध्ये सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
शेतकऱ्यांच्या या लढाईत काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे काळे कायदे रद्द करावेत यासाठी या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलने ही केली आहेत. मा. श्री. राहुल गांधीजी यांनी पंजाब आणि हरियाणामध्ये तर महाराष्ट्रामध्ये प्रभारी मा. श्री. एच.के. पाटीलजी आणि मा. प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरातजी यांच्या नेतृत्वामध्ये या काळ्या कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली ही काढण्यात आल्या. महाराष्ट्रातही विविध आंदोलने करुन या कायद्यांना विरोध दर्शवलेला आहे.
शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
माझी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना तसेच समस्त कोल्हापूरकरांना विनंती आहे, उद्याच्या या बंदमध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शांततेच्या मार्गाने व कडकडीत बंद पाळूया. या काळ्या कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदविण्यासाठी आपण सर्वानी उद्या आपल्या घराबाहेर काठीवर "काळा झेंडा" अथवा "काळे कापड" बांधून आपला विरोध दर्शवावा, ही विंनती.
धन्यवाद,
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, कोल्हापूर
Comentários